शिस्तबद्ध आणि भव्य सोहळ्याने वेधले नाशिकचे लक्ष
नाशिक: (प्रतिनिधी) सिडको परिसरात यंदाचा शिवजयंती उत्सव केवळ जयघोषापुरता मर्यादित न राहता तो सामाजिक प्रबोधन आणि शिस्तीचा आदर्श वस्तुपाठ ठरला. उत्सव समितीच्या अध्यक्षा इंजि. सौ. गायत्री विशाल डोखे (गांगुर्डे) यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आयोजित या सोहळ्याने नियोजनाचा नवा वस्तुपाठ घालून दिला असून, संपूर्ण नाशिक शहरात या सोहळ्याची चर्चा होत आहे.
शिवजयंती निमित्त सिडकोमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडे, ऐतिहासिक नाटके आणि युवा पिढीला प्रेरणा देतील अशा व्याख्यानांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिडको परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानीच ठरली. इंजि. गायत्री डोखे (गांगुर्डे) यांनी आपल्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करत कार्यक्रमाच्या नियोजनात सूक्ष्मता आणि भव्यता यांचा सुरेख संगम साधला.
या उत्सवाच्या यशात सामाजिक कार्यकर्ते आणि इंजि. गायत्री डोखे (गांगुर्डे) यांचे पती श्री. विशाल नारायण डोखे यांचे पडद्यामागचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. मिरवणुकीचे मार्ग, कार्यकर्त्यांचे नियोजन, प्रशासकीय परवानगी आणि कायदा व सुव्यवस्थेचा मान राखून झालेला समन्वय ही श्री. विशाल डोखे यांच्या नियोजनाच्या जमेची बाजू ठरली. त्यांच्या या सहकार्यामुळेच हजारो शिवप्रेमींचा सहभाग असूनही अत्यंत शांततेत आणि शिस्तीत सदरील सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाने श्री. विशाल डोखे यांचे संघटनात्मक कौशल्य प्रकर्षाने दिसून आले.
यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग. इंजि. गायत्री डोखे यांनी महिलांना संघटित करून या उत्सवात त्यांचा सहभाग निश्चित केला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला आणि लेझीम पथकांनी मिरवणुकीची शोभा वाढवली. सदर कार्यक्रमात स्वच्छता, शिस्त आणि वाहतुकीचे नियम पाळल्याबद्दल प्रशासनासह स्थानिक नागरिकांनीही आयोजकांचे आभार मानले.
“छत्रपती शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवणे आणि युवा पिढीला योग्य दिशा देणे हाच या आयोजनामागचा मुख्य हेतू होता,” अशी भावना इंजि. सौ. गायत्री विशाल डोखे (गांगुर्डे) यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सिडको परिसरातील विविध सामाजिक संस्था, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि शिवप्रेमींनी श्री. व सौ. डोखे दाम्पत्याचे विशेष अभिनंदन केले आहे.








